- ©
मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्यात यावा अशी मागणी गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गजानन पाटील यांच्याकडे केली आहे .
याविषयी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, संतोष सुखदेव वाघमारे हे पंचायत समिती शिरूर येथे . प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांचा दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला तसेच हौशीराम भीमराव गायकवाड हे पंचायत समिती दौंड जिल्हा पुणे येथे कार्यरत होते त्यांचा दिनांक 10 जून 2025 रोजी मृत्यू झाला .
या प्राथमिक शिक्षकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी , गट विमा ,उपादान (ग्रज्युएटी )च्या रकमा तातडीने मिळणे आवश्यक होते परंतु या शिक्षकांच्या कुटुंबीयांना आर्थिक बाबी पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. या शिक्षकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हक्काची कोणतीही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही .
त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याचे व शिक्षणाचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत .या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींचे आर्थिक अडचणीमुळे हाल होत आहेत ही बाब गंभीर आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आर्थिक लाभ देण्यात यावेत.
शिक्षण व अर्थ विभागातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी .या मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वाचे लाभ देण्यात यावेत अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे .
या निवेदनाच्या प्रति प्रधान सचिव ,सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त ,शिक्षण आयुक्तालय ,महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण उपसंचालक ,पुणे विभाग पुणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग , मुख्य वित्त व लेखा अधिकारी , शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्य प्रवक्ते व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण , राज्य सल्लागार दशरथ गावडे ,महिला आघाडीच्या नेत्या पौर्णिमा रणपिसे ,सुषमा तरटे ,सुजाता गायकवाड ,दीपक कदम ,संतोष ससाने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
