कालचा इयत्ता दहावीचा निकाल वर्तमान पत्रात वाचला. डोळ्यात पाणी आलं. महाराष्ट्रात ९४,५४४ विद्यार्थी मराठीतच नापास ! याचे कारण काय हा प्रश्न मनाला पडला ! आणि योगायोग पाहा. नेमकं याच काळात सरकारचा कल कुठे आहे?
संशय येण्यासारख्या गोष्टी…
*मराठी शाळा बंद, इंग्रजी शाळांना प्रोत्साहन*: गेल्या 5 वर्षात 1300+ मराठी शाळा बंद पडल्या. पण CBSE, ICSE च्या इंग्रजी शाळांना परवानग्या मात्र झटपट मिळतात. हा मराठीचा गळा घोटणे नाही का?
*व्यवहारात मराठी कुठे आहे?* मंत्रालयात फाईल इंग्रजीत, मोठ्या प्रोजेक्टचे करार इंग्रजीत, मुंबईतील बिल्डरांच्या जाहिराती गुजराती-हिंदीत… मग मराठी शिकून करायचं काय, असा प्रश्न मुलांना पडणारच ना?
. *”व्यापारी वर्गाची सोय” आधी*: रिक्षा-टॅक्सीवाल्यांना मराठी सक्तीवरून वाद झाला, पण मोठ्या उद्योगपतींना, गुजराती व्यापाऱ्यांना मात्र सवलतींचा पाऊस. मराठी माणसाच्या भाषेपेक्षा “गुजराती धार्जिण्या” धोरणांना प्राधान्य का?
निधीचा दुष्काळ*: मराठी भाषा विभागाला, मराठी ग्रंथालयांना, साहित्य महामंडळाला निधी देताना हात आखडता घेतला जातो. पण इतर राज्यातील महोत्सवांसाठी मात्र कोट्यवधी मंजूर होतात.
*९४ हजार नापास तरी सरकार गप्प*: इतर कोणत्याही विषयात एवढी मुले नापास झाली असती तर शिक्षण मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली असती. पण मराठीत ९४ हजार नापास… तरीही चिडीचूप? कारण मराठीची काळजीच नाही का?
सरळ प्रश्न आहे महाराष्ट्रात सरकार कोणाचे? मराठी माणसांच च ना की व्यापाऱ्यांचे?
ज्या मुंबईसाठी 106 हुतात्मे झाले, ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला, त्या भाषेची अशी दशा होताना सरकार डोळेझाक का करतंय?
*इंग्रजी शिकणे गुन्हा नाही. पण मराठी मारणे हा गुन्हा आहे!* आज ९४ हजार मुलं मराठीत नापास झाली. उद्या हीच मुले “आम्हाला मराठी येत नाही” म्हणून मराठीला लाथाडतील. तेव्हा जबाबदार कोण?
महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी शासनाचा रोडमॅप काय? की फक्त निवडणुकीपुरता “मराठी अस्मितेचा” बुरखा पांघरायचा असा आरोप उत्तमकुमार (भैय्या) नवघरे यांनी केला आहे.
मराठी माणसा, जागा हो आपली भाषा गेली तर स्वाभिमान जाईल. स्वाभिमान गेला तर महाराष्ट्र राहणार नाही असे वाटत आहे म्हणून सावध व्हा आणि सर्वांना जागे करा असे आवाहन बहुजन मित्र उत्तमकमार भैय्या नवघरे यांनी केले आहे.