
मागील दोन दशकांपासून महाराष्ट्राचे राजकारण ज्या काही मोजक्या नेत्यांभोवती केंद्रित होते त्यातलं एक सडेतोड व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा..!
आज त्यांचा बारामती येथे एका भीषण विमान अपघातात करुण अंत झाला. कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे.
फुले – शाहू – आंबेडकरी विचारांना व यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाला आपले आदर्श मानणारे जे हाताच्या बोटांवर मोजता येणारे राजकीय व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहेत त्यात त्यांचा समावेश होता.

अजितदादांचा कामाचा धडाका आणि रोखठोकपणा अवघ्या महाराष्ट्राला परिचित होता. उथळपणा, दिखावेगिरी, चमकोगिरी ही आजच्या राजकारणाचे अभिन्न अंग झालेले दिसत असतांना अजितदादा त्यापासून अलिप्त होते. दादांच्या कार्यशैलीवर, व्यक्तिमत्वावर, चरित्रावर अनेकांनी अगदी खालच्या भाषेत टीका केली, पण दादांनी त्याला शक्यतो प्रत्युत्तर देणे टाळले किंवा प्रत्युत्तर दिलेच तर त्यात खालची भाषा कधीच वापरली नाही, उलट मिश्किल टीका करत वातावरण हलकं करण्याचं अजब कसब त्यांच्याकडं होतं. त्यामुळेच आजच्या घटनेने त्यांच्या पाठीराख्यांइतकेच त्यांचे विरोधकही व्यथित झाले आहेत आणि मला वाटतं हाच अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू आहे.
प्रस्थापित ब्राम्हो – भांडवली विचाराला व त्यानुसार आवश्यक राजकारणाला पुढे नेणारे ते शिलेदार होते हे जरी सत्य होते, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले ते मीठ होते हेही सत्य आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण ‘बेचव‘ झाले आहे हेच खरे..!
अजितदादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन..!
