
उद्या कधीच येणार नाही,आजच आणि आताच सुरुवात करा.
काल गेला आहे.उद्या अजून आला नाही.आपणाकडे फक्त आजच आहे.चला सुरुवात करू या.
“Yesterday is gone. Tomorrow has not yet come. We have only today. Let us begin.”― Mother Theresa♥️
असे म्हणतात”उद्या”कधीच येत नाही आणि काळ तर निघून गेलेला असतो,तो काही परत आणता येत नाही. मग आपल्या कामाचा दिवस म्हणजे आज आणि फक्त आजच. आणि तोच सुद्धा क्षणक्षणाला निघून चालला आहे.माणसाची एक प्रवृत्ती आहे ती म्हणजे पुढे ढकलणे,उद्या पाहू.शक्य तो जे काम आपल्याला आवडत नाही,करावेसे वाटत नाही ते करण्याचा उत्साह बहुतेकांमध्ये नसतो. अगदी सकाळपासून घ्या.फिरावयास जायचे ठरवितो.मग अलार्म लावला जातो.तो पहाटे सकाळी वेळेवर वाजतो,पण काल ठरविलेले असले तरी तो अलार्म आधी झोपेतच बंद करतो. शरीर आणि मन दोन्ही उठावास तयार नसते मग आपल्या मनाशीच ठरवितो पाच मिनिटे झोपून उठू या. नि मग झोपेतच तास कधी निघून जातो ते कळतच नाही.मग उठून पाहतो तो वेळ निघून गेलेली असते.मग मनाशीच ठरवितो उद्या असे करावयाचे नाही,जायचेच.

आणि तेच उद्या सुद्धा घडते कारण एक दिवस निघून गेलेला असतो.म्हणजे “फिरवायला निघण्याचा उद्या”कधीच येत नाही.आहे ना असाच अनुभव.?मग जे रोज नियमितपणे पहाटे फिरवायला जाणारे लोक काय करीत असतील.?
मी रोजच जातो कधीच सुट्टी घेत नाही.कारण एकतर रोजचा आनंदी अनुभव मनात असतोच.सुंदर वातावरण,पाऊस पडत असला तरी.रस्त्याने रोजच भेटणारे मित्रा सारखे लोक,नावे माहित नसली तरी हात वर करून नमस्ते,गुड मॉर्निंग ची देवाणघेवाण.काल न भेटलेल्यांची आपुलकीने विचारपूस.परिचयाच्या लोकांशी,मित्र मैत्रिणीशी थोड्या गप्पा.भाजीवाल्या बरोबर नेहमीचीच बोलणी आणि प्रेमाची हुज्जत. वेळ कसा जातो ते कळतच नाही.म्हणजे डोक्यात तो आनंद भरलेला असल्यानंतर फिरणे चुकविणे शक्यच नाही.मग मी प्रथम उठून बिछान्यातच बसतो.मग परत बेडला पाठ लावण्याचा प्रश्नच येत नाही.
कारण मला फिरायला जायला आवडते.चांगल्या आरोग्याचा मिळणार फायदा ही नंतरची बाब.अनुभव असा आहे डॉ वजन कमी करण्यासाठी किव्हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी पहाटे/सकाळी फिरवायला जाण्याचे सांगतात असे लोक जास्तीत जास्त एक आठवडा जातात नंतर अनेक कारणे सांगून बंद करतात.कारण दुसर्यांनी सांगितले म्हणून ते गेले,त्यांनी स्वतः आनंद मिळणार आहे म्हणून ठरविले नाही.

योगाचे फायदे खूप सांगितले,मग आपणाला सुद्धा हे घेण्यासाठी योग करण्याचे ठरवितो.पण किती दिवस जातो?स्वतःलाच विचारा.योगा शिकविणाऱ्या माझ्या गुरूने विचारले,”तुला दिवसातून केव्हा केव्हा श्वास घेतला माहीत आहे? श्वासाचा आनंद कधी अनुभवला आहे?”तसा विचार आपण कधीच करीत नाही. मग त्या दिवसापासून मी स्वासाचा आनंद घेण्यास सुरुवात केली ते आज पर्यन्त. सकाळी किमान एक तास,नाही तर अर्धा तास तरी?बघा प्रयोग करून.याचा सोपा अर्थ असा आहे की कोणतेही काम करण्यासाठी ते आधी आवडावे लागते,माझ्या भाषेत त्यावर प्रेम करावे लागते.मग प्रेमाला कसा नकार देता येईल? कोणकोणत्या गोष्टी आपणास आवडतात?खरे तर आपण आपली आवड निवड कधीच ठरवित नाही,ती ठरत जाते.लहान पणापासून आईवडिलांनी चांगले म्हणून सांगितलेले,त्यात मित्र शेजारी पाजारी मिळालेली माहिती,त्यातून जे बरे वाटते ते आपण घेतो.आणि मग म्हणतो मला हे आवडते आणि ते आवडत नाही.पण मला असा कोणी भेटला नाही की तो मला चोरी करणे,खोटे बोलणे आवडते वगैरे.म्हणजे आवडण्यामध्ये योग्य असणे चांगले असणे हे प्राधान्ये करून असले पाहिजे हे नक्की.शिवाय चांगले करण्याने कौतुक होते. लोक चांगला म्हणू लागतात.आपला समाजात मान वाढतो तसेच आपलीच आपल्याला प्रौढी वाटू लागते.म्हणजे योग्य आणि चांगले करणे याची आवड आपणच निर्माण केली पाहिजे. मला लहानपणापासूनच आईने शिकविले होते कि जेवणातील सर्व पदार्थ आवडले पाहिजे.प्रत्येक पदार्थाची एक वेगळीच चव असते,ती घेतल्याशिवाय कसे कळेल?मग मला प्रत्येक पदार्थाची आवड निर्माण होऊ लागली आणि आज ताटात जे प्रेमाने दिले जाते ते सर्व मला आवडते.मला अनेक चवीचा आस्वाद घेता येतो आणि लहानपणी आई,मोठेपणी बायको आणि म्हातारपणी सून एकदम खुश.किती फायदा आहे ते पहा.शिवाय बाहेर कुठेही गेलो तरी तेथील लोक सुद्धा खुश.
पालकांना नेहमी मुलाबाळांचे चांगले व्हावे असे वाटते

आणि त्याप्रमाणे ते कृती करतात नि मुलांना सांगतात. मुलांना सुद्धा ते योग्य वाटते.पण ते सुद्धा प्रेमाने सांगितले तर.शिस्तीच्या नावाने मारून सांगा ते त्यांना कधीच आवडणार नाही ठरवून वाईट कोणी सांगत नसतील तरी जे आंधळेपणाने,धर्म, जातीच्या नावाखाली चांगले आहे म्हणून सांगितले जाते ते वाईट असण्याची शक्यता असते तरी ते चांगले म्हणून सांगितले असल्यामुळे आंधळेपणाने चान्गले वाटते.ते जो पर्यंत तुम्ही तपासून पाहत नाही तो पर्यंत ते चांगलेच आहे असा विश्वास ठेवता. किव्हा त्यात जर भीती घातली असेल तर चांगल्या वाईटाचा विचार ना करता आपण स्वीकारतो. म्हणून आपण त्याची तपासणी केली पाहिजे,चिकित्सा केली की चांगले वाईट कळते. यालाच ज्ञान होणे असे म्हणतात.ज्ञान घेणे वाईट आहे असे कुणी म्हणाल्याचे आठवते?ज्ञानेश्वराने मुक्तीचा मार्ग सांगितलं नाही,ज्ञानाचा मार्ग सांगितला.अज्ञानापासून मुक्त होतो..तरी आपण अज्ञान ठेवतो कारण मनात भीती असते.लग्न ठरवीत असताना स्वभाव जुळतात का नाही ते कोणी पाहत नाही, परंतु कुंडली जमते का नाही ते पाहणे आवश्यक! शिकलेल्या लोकांनाही आवश्यक वाटते. अन मग मुलीला कुंडलीत मंगळ असेल तर?लगेच भीती.आणि मग कुंडली जमत नाही म्हणून लग्न नाही.मला हे कळत नाही की लाखो मेल दूर असलेला मंगळ मुलीचे लग्न होई पर्यंत वाट पाहतो आणि मुलाला मंगळ नसेल तर त्याला मारून टाकतो.हा विनोद आहे असे वाटते ना?पण भीतीमुळे अज्ञान सुद्धा आवडू लागते..आता मंगळावर गेलो चंद्रावर गेलो,शनी वर सुद्धा जाऊ पण ते कुणी तरी वाईट देव असून आपल्या जीवनावर प्रभाव टाकतो असे समजणे अज्ञानाशिवाय दुसरे काय असेल?पण असे बोललो तर आजही लोकांना वाईट वाटते.शिवाय बघणारे बघू दे आपले काय जाते असेच म्हणणे हे ज्ञानावर विश्वास नसल्याचे लक्षण. पदवी घ्यायची आणि ज्ञानाचा वापराचं करावयाचं नाही,कसे चालेल?रस्त्यावर लिंबु मिरचीच्या माळा दिसल्या की आज अमावश्या आहे ते कळते.मग एकादी शिक्षित महिला ते विकत घेऊन आपल्या स्कुटरला बांधते तेव्हा त्यांच्या अज्ञानाची मलाच लाज वाटू लागते. जाऊ द्या पण तुम्हाला जे आवडते असे वाटते ते तपासून पहा,खरेच ते आवडते का भीतीमुळे,आंधळेपणाने तुम्ही ते करता हे सुद्धा तपासून पहा.मग अज्ञान दूर होईल.ज्याची कृती करायला आवडते,त्यात आनंद मिळतो तेच करा.परंतु अनेक चांगल्या गोष्टींची आवड निर्माण करा.कारण खरा आनंद निर्मितीमध्ये असतो,ते तर हमखास आवडते,त्यात आनंद मिळतो.किव्हा कशाकशा मध्ये आनंद मिळतो,ते योग्य असेल तर करा अयोग्य असेल तर विकृती म्हणतात. निर्भेळ आनंदासाठी मग आवड प्रेम निर्माण करा.तुमच्याच हिताचे आहे.
आपल्या धर्म जाती आणि अंधःश्रद्धा,यातील भीती तसेच चुकीच्या गोष्टी करणे आनंददायक वाटत असेल तर अशा अज्ञानीपणाचा काही स्वार्थी लोक सत्ता मिळविण्यासाठी वापर करीत असतात.ते धर्माचे नाव घेऊन तिरस्कार करण्यास,हिंसा करण्यास सांगत असतील तर हे चांगले आहे असे वाटत असेल तर ते तुमचा उपयोग करून घेत आहेत हे लक्षात ठेवा.मग तुम्ही वाईट गोष्टींना सुद्धा चांगले म्हणत असाल तर ती विकृती तर आहेच शिवाय ही लांच्छनास्पद गोष्ठ आहे हे निश्चित.तसेच कुणाच्या तरी सांगण्यावरून चांगल्याला वाईट म्हणणारे लोक आहेत.इतिहास शिकविणारा जर नेहरूंना वाईट म्हणत असेल तर त्याने खरा इतिहास आणि नेहरूंचे योगदान त्याला कळले असते.ते ना जाणून घेणे,विशेषतः इतिहास शिक्षणाने म्हणजे पिढ्यांचे नुकसान.हे समाज आणि देशाला घातक आहे मग तुम्हीच ठरवा की चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले किती दिवस म्हणणार?कपाळमोक्ष होई पर्यंत?विचार करा ज्ञानी व्हा.
एकदा का चांगले वाईट काय असते त्याचे ज्ञान झाले की मग चांगल्या योग्य गोष्टी आवडू द्या.आणि असे चांगले करणे आवडत असेल तर ते करण्याची आजच सुरुवात करा.काल आपण काय चुका केल्या ते लक्षात घेऊन,तपासून शिका,म्हणजे ज्ञान घ्या.उद्या येणार आहे,तो अधिक चांगला सुखशांतीचा पाहिजे असेल तर,”काल गेला आहे.उद्या अजून आला नाही.आपणाकडे फक्त आजच आहे.चला सुरुवात करू या.
“Yesterday is gone. Tomorrow has not yet come. We have only today. Let us begin.”― Mother Theresa
हेच लक्षात ठेवा. सावधान विकृतीला आणि हिंसेला मग ती मनाची असली तरी बिलकुल थारा देऊ नका…
