करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर “मराठी शाळा वाचवा, शिक्षण हक्क वाचवा” या अभियानांतर्गत शिक्षक भारती संघटनेचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
धार्मिकतेसोबत सामाजिक जाणीव जागवणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांमध्ये मराठी शाळांविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली.
मराठी शाळांसाठी गौंडरेत जनजागृतीची ठिणगी पडली आहे यास गौंडरे ग्रामस्थांचा ठाम पाठींबा असल्याचे दिसून आले. अखंड हरिनाम सप्ताहातून सामाजिक संदेश; सेल्फ फायनान्स शाळांच्या मोहाला बळी न पडण्याचे आवाहन या ठिकाणी चर्चेचा केंद्रबिंदू होता.

कार्यक्रमाला प्राथमिक शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक भारती संघटनेचे तालुका सचिव सचिन गाडेकर यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना सेल्फ फायनान्स शाळांच्या आकर्षणाला बळी न पडण्याचे ठाम आवाहन केले.
जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व संस्कारक्षम शिक्षणासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. झेडपी शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचा दर्जेदार विकास साधण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.

यावेळी शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी संघटना राज्यस्तरावर सातत्याने लढा देत असल्याचे स्पष्ट केले. सेल्फ फायनान्स शाळांमधील बोगस कारभारामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घटत असल्याची खंत व्यक्त करत, भविष्यात झेडपी शाळा बंद पडल्यास गरीब व बहुजन समाजाला मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. मराठी शाळा टिकवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
सेल्फ फायनान्स स्कुल चालवणारे लोक व्यापारी मानसिकतेचे लोक आहेत यांना समाजसेवेचे काही देणे घेणे नाही. शिक्षण हे क्षेत्र ज्ञानदानाचे क्षेत्र आहे. यामध्ये फक्त मिळणारे आर्थिक उत्पन्न यावरच यांचा डोळा आहे. पुरेशा प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाही तर शाळा बंद करून पळून जाणे हा यांचा व्यापारीकरण चा मुखवटा समोर येणार आहे. यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा शासकीय शाळा धुळीस मिळणार यात काही शंका नाही असेही मत शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड सरांनी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक विजयकुमार खंडागळे यांनी भारतीय वृक्ष देऊन मान्यवरांचा सन्मान केला.

धर्मवीर संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू नीळ यांनी गावातील मराठी शाळा ही ज्ञानपरंपरा जपणारी संस्था असून तिचे अस्तित्व टिकवणे ही ग्रामस्थांची कर्तव्यभावना असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भागीरथी माने होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ग्रामस्थांच्या विश्वासास तडा जाऊ न देता सहशिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, गौंडरे येथील अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी रामनवमीपासून सुरू होऊन हनुमान जयंतीपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. या सप्ताहात लोकशिक्षण, सामाजिक ऐक्य व जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
